अप्रात्र आणि संशयास्पद लाभार्थ्यांची शोधमोहीम सुरू
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबात दोन लाभ घेणे, मयत व्यक्तींच्या नावाने पैसे जमा होणे किंवा करदात्या व्यक्तींनी लाभ घेणे असे प्रकार समोर आले आहेत. यामुळे कृषी विभागाने अशा ‘संशयास्पद’ लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते अचानक बंद झाले आहेत किंवा ज्यांचे नाव या संशयास्पद यादीत आहे, त्यांना आता ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ (प्रत्यक्ष पडताळणी) फॉर्म भरून देणे बंधनकारक आहे. हा फॉर्म न भरल्यास तुमचा आगामी हप्ता रोखला जाऊ शकतो.
यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष पडताळणी अनिवार्य
राज्यभरातील प्रत्येक तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांकडे संशयास्पद लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांना कृषी सहायकामार्फत एक विशेष अर्ज दिला जात आहे. या अर्जामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील आणि तो शेतकरी प्राप्तिकर भरतो का? किंवा कोणत्याही शासकीय पदावर कार्यरत आहे का? याची सविस्तर माहिती विचारली जाते. ही माहिती भरून दिल्यानंतर कृषी विभाग त्याची शहानिशा करेल आणि त्यानंतरच संबंधित शेतकऱ्याचा पुढचा हप्ता पात्र ठरवला जाईल.




















